श्री गणेशायनमः

आज पासून रोज काही तरी लिहिण्याचे योजिले आहे.

अनेक विषय डोक्या मधे भिनत आहेत. नुकताच झी मराठी वाहिनीवर सा रे ग म प लिटिल चैम्प्सच्या महाअन्तिम फेरीचा सोहळा संपन्न झाला. कार्तिकी गायकवाड महा विजेती म्हणून घोषित झाली. उकडीचा मोदक प्रथमेश लघाटे, प्रेटी यंग गर्ल आर्या अंबेकर, फ्यूचर कॉम्बो म्यूजिक डॉयरेक्टर रोहित राऊत आणि लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन उपविजेते ठरले.

कार्तिकीच्या नम्रतेने सर्वच प्रेक्षक अतिशय प्रभावी झाले आहेत. तिने माउलीचा आशिर्वाद जन्मापासून मिळविला आहे. तिचे वडील उत्तम गायक, वारकरी संप्रदायाचे उत्तम अभ्यासक आणि कुशल संगीतकार आहेत. ते स्वतः श्री अजय पोहनकर यांचे शिष्य आहेत. कार्तिकीने मात्र अभंग न गाता इतर रुपांचे (forms) ही चांगले प्रशिक्षण मिळविले आहे.

ह्या संपूर्ण पर्वाच्या संदर्भात एक गोष्ट नक्की लक्षात आली कि माद्यम फारचं पावरफुल झाले आहेत. ह्या ५० मुलांनी गेले सहा महिने महाराष्ट्राला  दर सोमवार व मंगळवार छोट्या पडद्यासमोर खिळवून ठेवले होते. डॉ. आनंद नाडकर्णीने समाजमानसशास्त्रीय भाष्य असे केले कि मराठी समाजातील पिढ्यांमधील अन्तर (Generation gap) कमी करण्य़ात ह्या कार्यक्रमाला निश्चित यश प्राप्त झाले आहे. आजी व नात दोघी आज एकच गाणे गाताना आढळतात. त्यांच्यातील सुसंवादाला आज एक नवे दालन उपलब्ध झाले आहे.

संगीताचा किंवा काव्याचा फारसा गंध नसलेल्या सामान्य प्रेक्षकांना सुद्धा बरेच काही शिकायला मिळाले. आध्यात्मिकता म्हणजे काय याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. ते मान्यवर म्हणून आलेल्या महान संगीतकार-गायकांच्या बोलण्या-वागण्यातून बघायला मिळाले. उदा. प्रसिद्धीपराङ्मुख पं हृदयनाथ मंगेशकरांच्या व्यक्तिमत्वाबाबत लोकांच्या मानसविश्वात जे काही संभ्रम होते ते त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाने दूर झाले. झी मराठीच्या टीमला महाराष्ट्रीय संगीताचे एकीकरण करण्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकराच्या हिन्दुत्ववादाबद्दल अनेक विपरीत ग्रह गेल्या पिढीच्या  मनात ठासले होते. आंबेडकर, गांधी व सावरकर हे समकालीन युगपुरुष, तिघे ही उत्तम तत्त्वचिंतक. देशाची राजकीय परिस्थिती पारतंत्र्यांची असल्यामुले त्या समयी त्यांना स्वातंत्र्याला प्राथमिकता द्यावी लागली. समाज सुधारणेच्या बाबतीत हे तिघेही खुल्या मनाने विचार करणारे मनिषि होते. तात्यासाहेबांच्या समोर तर लोकमान्याचा आदर्शच होता. परन्तु २६ जानेवारीच्या निमित्त्ताने सादर झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे प्रबोधन करण्यात झी मराठीने नक्कीच बाजी मारली आहे.

जातिवाद व आरक्षण हे मुद्दे आता वैश्वीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या जमान्यात कालबाह्य झालेले आहेत. तरी ही कार्तिकीच्या निवडीत तिच्या मेरिट बद्दल शंका उपस्थित करणारे व निर्णय-प्रक्रिया संपूर्ण लोकशाही मार्गाने न जाता पंच परमेश्वराला निम्मे अधिकार देऊन झी मराठीने ह्या वादातून स्वतःला मोकळे ठेवल्याचा ठपका ठेवणारे नेटकर अजून ही जुन्या व्हायरस मधून स्वतःला क्लीन करू शकलेले नाहीत.

फडके, खाडिलकर, पंडित,वाडकर व अभ्यंकर ही आडनावे असलेले ज्यूरी असून ही गायकवाड विजयी ठरते हे तिच्या मेरिटचे प्रमाणपत्र नाही का? तिच्या नावाची घोषणा खळेकाकां सारख्या पितामहाच्या मुखातुन झाली असल्याने नेटवरील ह्या राजकीय वादावर आता पडदा पाडला पाहिजे.

Tags: , , , , ,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s


Follow

Get every new post delivered to your Inbox.